नवले ब्रिजवर कंटेनर अपघातामुळे महामार्गावर मोठा ट्रॅफिक जाम

खडकवासला मतदारसंघ : प्रतिनिधी सुनील पंदरकर
४ मे २०२६ मुंबई–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले ब्रिज पुणे येथे आज सोमवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. MH 46 AR 6920 या क्रमांकाचा कंटेनर ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या गार्डपट्टीवर जाऊन धडकला. या धडकेत ट्रकमधील कंटेनर रस्त्यावर आडवा पडल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली.
या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, अपघातानंतर लगेचच मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही वाहतूक कोंडी कात्रज बोगद्यापर्यंत पोहोचल्याचे दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस व प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोन क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करण्यात आले. काही वेळानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली.
दरम्यान, नवले ब्रिज हा अपघातप्रवण भाग म्हणून ओळखला जात असून येथे वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या मार्गाच्या दुरुस्तीबाबत व सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून वारंवार करण्यात येत आहे. तरीही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.



