Site Logo
गुन्हेगारीपुणेमहाराष्ट्र

PMRDA कागदपत्र बनावट प्रकरण : २१ जणांविरुद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे | प्रतिनिधी
दिनांक : २३ जुलै २०२६
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) आणि पुणे महापालिकेच्या नावाने कथित बनावट कागदपत्रांचा वापर करून खरेदीखतांची नोंदणी केल्याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पुण्यातील बांधकाम आणि जमीन व्यवहार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हवेली क्रमांक २० येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयाचे सह दुय्यम निबंधक रवींद्र नामदेव कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष दादासाहेब गायकवाड यांनी केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली होती. तपासादरम्यान PMRDA तसेच पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये संबंधित खरेदीखतासोबत जोडण्यात आलेली विकास परवानगी, प्रारंभ प्रमाणपत्र (Commencement Certificate), भोगवटा प्रमाणपत्र (Occupancy Certificate) आणि इतर संबंधित कागदपत्रे बनावट असल्याचे समोर आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात सचिन अशोकराव पाटील, महेश नामदेव कुडले यांच्यासह एकूण २१ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या प्रकरणामागील नेमके सूत्रधार कोण, बनावट कागदपत्रे कशी तयार करण्यात आली आणि त्याचा किती व्यवहारांमध्ये वापर झाला याचा तपास सुरू आहे. या कारवाईमुळे जमीन खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये कागदपत्रांची सत्यता तपासण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून,भविष्यात अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button