सामाजिकपिंपरी चिंचवडमनोरंजन

स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

 

आमदार अण्णासाहेब बनसोडे व नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे यांच्या सौजन्याने दिवाळी पहाट रंगली; अभिनेत्री भाग्यश्री (टिना) शर्मा घेवारे यांचा पुढाकार

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) | दि. ८ नोव्हेंबर २०२६


दिवाळीच्या मंगलमय वातावरणात संगीत, गायन, वादन, लावणी आणि महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा सुरेल संगम अनुभवण्याची संधी पिंपरी-चिंचवडकरांना मिळाली.

महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष तथा पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णासाहेब दादू बनसोडे आणि प्रभाग क्रमांक ९ चे नगरसेवक सिद्धार्थ अण्णासाहेब बनसोडे यांच्या सौजन्याने अखिल पिंपरी-चिंचवड कलामंचच्या वतीने रविवारी (दि. ८ नोव्हेंबर) दिवाळी पहाट, सांस्कृतिक कार्यक्रम आणि फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून शहरातील स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले.

अखिल पिंपरी-चिंचवड कलामंचच्या संस्थापक अध्यक्षा अभिनेत्री भाग्यश्री (टिना) शर्मा घेवारे यांच्या पुढाकारातून तसेच संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाराष्ट्राची लोकधारा, अभंग, भक्तिगीते, भावगीते, हिंदी-मराठी गाणी, लावणी, लोकगीते आणि काव्यरचना अशा विविध कलाप्रकारांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाला पत्रकार मुज्जफर इनामदार, आंतरराष्ट्रीय गायक चंद्रकांत पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र जगताप, चित्रपट निर्माते सूर्यकांत पवार आणि कीर्तनकार पुरुषोत्तम हिंगणकर महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

यावेळी अभिनेत्री भाग्यश्री (टिना) शर्मा घेवारे यांनी आमदार अण्णासाहेब दादू बनसोडे यांचे विशेष आभार मानले. त्या म्हणाल्या की, पिंपरी-चिंचवडमधील कलाकारांच्या पाठीशी अण्णासाहेब बनसोडे नेहमीच खंबीरपणे उभे राहतात. कलाकारांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या कलेला संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांचे सातत्याने सहकार्य लाभते. त्यामुळे ते अखिल पिंपरी-चिंचवड कलामंचचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत.
तसेच कार्यक्रमासाठी अत्यंत कमी वेळेत सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉल्फिन्स गार्डन स्टुडिओ, सांगवीचे सर्वेसर्वा राज सोमवंशी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचेही त्यांनी आभार व्यक्त केले.
गायकांच्या सुरांनी आणि लावणीच्या ठेक्यांनी रंगली दिवाळी पहाट!

कार्यक्रमात विद्या गायकवाड नढे, गायत्री साळवे, अशोक टाकळे, मनीषा इंगोले, जगन्नाथ खाडे, शेखर चांदणे, अमित देशमाने, प्रतीक सत्वाधीर, रेखा दुसाने, कोमल भोसले, सागर डाडर, संतोष माहेश्वरी, प्रमोद कुलकर्णी, सविता कोरडे, कविता तळेकर, मनीषा सपकाळे आणि सुरेखा कुलाल यांनी आपल्या सुमधुर गायनाने कार्यक्रमात रंगत आणली.
वाद्यवृंदामध्ये सेन कुमार, श्रीराम इंगळे, अशोक जाधव, विलास अडागळे, सोमनाथ कांबळे, राजकुमार काजोरिया, लखन अडागळे, गोकुळ आणि रोहन कळदकर यांनी उत्कृष्ट वादन केले. वृषाली सातपुते, भारती मोरे, सुजाता कुंभार आणि फिरोज मुजावर यांनी बहारदार लावणी सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.
महाराष्ट्राची लोकधारा या विशेष सादरीकरणातून रवी कांबळे, सँडी पाटील, सिद्धांत घागरमले, कावेरी गंगाळे, आकाश गायकवाड, रवींद्र शिंदे, लीनेश घाडगे, अमोल अडागळे आणि भाऊसाहेब सांगळे यांच्या समूहाने महाराष्ट्राच्या लोककलेचा सुंदर आविष्कार सादर केला.
कार्यक्रमाची ध्वनी व्यवस्था सुनील पाटील (टेक्नॉलॉजी साऊंड) यांनी उत्कृष्टपणे सांभाळली, तर लीनेश घाडगे आणि विक्रांत शिंदे यांनी प्रभावी निवेदन केले. प्रकाश नवगिरे, मनीषा बाराथे, मेबल अल्हाट, मंगला पवार आणि मोनिका शिंदे यांच्यासह अनेकांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मोलाचे योगदान दिले.
स्थानिक कलाकारांना प्राधान्य देण्याचा कलामंचचा संकल्प!
पिंपरी-चिंचवडमधील अनेक कलाकारांकडे उत्तम गुणवत्ता आणि कला असूनही त्यांना योग्य व्यासपीठ व संधी मिळत नाही. अशा कलाकारांना एकत्र आणणे, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना समाजासमोर ओळख मिळवून देणे हा अखिल पिंपरी-चिंचवड कलामंचचा प्रमुख उद्देश आहे. स्थानिक कलाकारांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांच्या कलेला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी संस्था भविष्यातही सातत्याने कार्यरत राहील, असा विश्वास संस्थापक अध्यक्षा भाग्यश्री (टिना) शर्मा घेवारे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवर, कलाकार, पदाधिकारी, सदस्य, रसिक श्रोते आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले. दिवाळीच्या आनंदोत्सवात स्थानिक कलाकारांच्या कलेला मिळालेले हे व्यासपीठ पिंपरी-चिंचवडच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button