सामाजिक

विमल इलायचीच्या जाहिरातीवरून अजय देवगण अडचणीत; महाराष्ट्र FDA च्या नोटिशीला उच्च न्यायालयात आव्हान!

 

प्रतिबंधित पानमसाल्याची सरोगेट जाहिरात केल्याचा FDA चा आरोप; शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांनाही नोटीस

 

मुंबई (प्रतिनिधी) | शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याच्यासमोर विमल इलायचीच्या जाहिरातीवरून कायदेशीर अडचण निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीला आव्हान देण्यासाठी अजय देवगण याने थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणामुळे बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या जाहिराती आणि प्रतिबंधित उत्पादनांच्या अप्रत्यक्ष प्रचाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, विमल इलायचीच्या नावाखाली करण्यात आलेल्या जाहिरातींमधून प्रत्यक्षात प्रतिबंधित विमल पानमसाल्याचा अप्रत्यक्ष प्रचार केला जात आहे. त्यामुळे ही जाहिरात सरोगेट जाहिरातीच्या स्वरूपात मोडत असल्याचा FDA चा आरोप आहे.

या प्रकरणात अजय देवगण याच्यासह बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांनाही FDA कडून कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.

अजय देवगण याने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत, संबंधित नोटीस अभिनेत्याला बजावणे मनमानी स्वरूपाचे असल्याचे म्हटले आहे. जाहिरातीत आपण केवळ विमल इलायची या उत्पादनाचे समर्थन केले असून, विमल पानमसाल्याचा प्रचार केलेला नाही, अशी त्याची भूमिका असल्याचे वृत्त आहे. तसेच संबंधित कारवाई उत्पादक कंपनीविरोधात होणे अपेक्षित असल्याचा मुद्दाही याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना या प्रकरणातील तिन्ही अभिनेत्यांविरोधातील विभागीय कार्यवाही पूर्ण  झाल्याचे सांगितले. पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण संयुक्त आयुक्तांकडे पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अजय देवगणच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वी या प्रकरणाशी संबंधित उत्पादक कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयातही दाद मागितली होती. मात्र, महाराष्ट्रातील FDA च्या कारवाईशी संबंधित प्रकरण असल्याने महाराष्ट्रातील न्यायालय हे योग्य व्यासपीठ असल्याचे निरीक्षण नोंदवत दिल्ली उच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळली होती.

आता अजय देवगणने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याने या प्रकरणात न्यायालय काय भूमिका घेते, याकडे चित्रपटसृष्टीसह जाहिरात क्षेत्राचे लक्ष लागले आहे. ४ नोव्हेंबरच्या संभाव्य सुनावणीत या प्रकरणाला कोणते वळण मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

— दैनिक आपला राजस्तंभ वृत्तसेवा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button