सामाजिकपिंपरी चिंचवडपुणेमनोरंजनमहाराष्ट्र

टिना शर्मा घेवारे यांना ‘कलागौरव’ पुरस्कार जाहीर

१३व्या वर्षी सुरू झालेला कलाप्रवास; सामाजिक कार्य आणि कलाकारांच्या प्रश्नांसाठीच्या योगदानाची दखल
पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी), दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवडच्या मातीत वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी आपल्या कलाप्रवासाची सुरुवात करणाऱ्या अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या टिना शर्मा घेवारे यांना यंदाचा ‘कलागौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘बोल मै हलगी बजाऊ क्या’ या गाण्यातील अभिनयासह कलाक्षेत्रातील योगदान आणि सामाजिक कार्याची दखल घेत त्यांचा हा सन्मान करण्यात येणार आहे.
रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड कलाकार संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा सन्मान निळू फुले नाट्यगृह, कोथरूड, पुणे येथे होणार आहे.
‘हा सन्मान माझ्यासाठी नवी ऊर्जा आणि नवी जबाबदारी’
आपल्या जन्मभूमीत आणि आपल्या कलाप्रवासाला ओळख देणाऱ्या शहराच्या मातीत ‘कलागौरव’ पुरस्काराने सन्मानित होणे हा अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक क्षण असल्याची भावना टिना शर्मा घेवारे यांनी व्यक्त केली.
रामकृष्ण नाट्यगृहापासून वयाच्या १३व्या वर्षी त्यांच्या कलाप्रवासाला सुरुवात झाली. पिंपरी-चिंचवड शहरानेच आपल्याला कलाकार म्हणून ओळख दिली असून, या शहराचे आणि कलेचे ऋण फेडण्यासाठी कलाकारांसाठी काम करणे ही आपली जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.
अण्णा बनसोडे यांच्या सहकार्याचा उल्लेख
कलाकारांच्या प्रश्नांसाठी काम करताना विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे घेवारे यांनी नमूद केले. कलाकारांच्या अडचणी समजून घेणे, त्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन देणे तसेच त्यांच्या प्रश्नांना पाठबळ देण्याची भूमिका ते सातत्याने बजावत असल्याचे त्यांनी सांगितले. या सहकार्यामुळे कलाकारांसाठी काम करण्यास अधिक बळ आणि आत्मविश्वास मिळतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कलाकारांच्या प्रश्नांसाठी पुढेही लढा
DJ शो आणि अश्लील कार्यक्रमांविरोधात राबविलेली मोहीम, कलाकारांच्या विविध प्रश्नांसाठी केलेले सामाजिक कार्य आणि कलाक्षेत्रातील योगदान यांची दखल घेऊन ‘कलागौरव’ पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे घेवारे यांनी सांगितले.
या सन्मानामुळे भविष्यात आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळणार असून, कलाकारांना योग्य व्यासपीठ मिळवून देणे, त्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठविणे आणि त्यांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करणे हे काम यापुढेही सुरूच ठेवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
“आपल्या कामाची दखल घेतली जाते, तेव्हा आणखी जोमाने काम करण्याचे बळ मिळते. हा सन्मान माझ्यासाठी नवी ऊर्जा आणि नवी जबाबदारी आहे.”
दरम्यान, ४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याबद्दल टिना शर्मा घेवारे यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, पिंपरी-चिंचवड कलाकार संघ, रसिक प्रेक्षक, सहकारी कलाकार आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button