स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम (जून २०२६ बॅच) उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्


पुणे, दि. २२ जुलै : अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था (AIILSG), विभागीय केंद्र पुणे येथे स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम (जून २०२६ बॅच) चा उद्घाटन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. प्रकाश जावडेकर, माजी खासदार तथा भारत सरकारचे माजी केंद्रीय मंत्री उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पुणे केंद्राचे विभागीय संचालक श्री. दगा मोरे यांनी प्रमुख पाहुण्यांचे पारंपरिक पुणेरी पगडी, शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी मार्गदर्शन करताना मा. श्री. प्रकाश जावडेकर यांनी शहरी स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण संवर्धन यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना घनकचरा व्यवस्थापन, ओला व सुका कचरा वर्गीकरण, स्वच्छता व्यवस्थापनातील आधुनिक संकल्पना, सार्वजनिक आरोग्य तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याची गरज याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. स्वच्छता निरीक्षक ही समाजासाठी अत्यंत जबाबदारीची भूमिका असून विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान व कौशल्य समाजहितासाठी उपयोगात आणावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या उद्घाटन समारंभात स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रमाच्या प्राध्यापकांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावरील ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच मागील शैक्षणिक वर्षात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास डॉ .एस. जी. गायकवाड, प्राचार्य, स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम, तसेच सौ. अर्चना फाळके, उपसंचालक (लेखा व प्रशासन) यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमास पुणे विभागीय केंद्रातील अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक तसेच स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम जून २०२६ बॅच मधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, पुणे विभागीय केंद्राच्या वतीने स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले व त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक आणि व्यावसायिक भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.गोविंद नामदे यांनी केले व आभार श्री. विक्रांत चावक यांनी मानले.



