
- कोथरूड :प्रतिनिधी
जोग एज्युकेशनल ट्रस्टचे पी. जोग कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, पी. जोग लॉ कॉलेज व लेट पी. बी. जोग ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “प्रवाह 2026” या वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे भव्य आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा, कला व संस्कृती यांचा समन्वय साधणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला.
या महोत्सवामध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कबड्डी, खो-खो, क्रिकेट, बॅडमिंटन, टग ऑफ वॉर, थ्री लेग रेस अशा अनेक खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मैदानावर खेळाडूंनी दाखवलेला जोश, शिस्त आणि संघभावना पाहण्यासारखी होती. खेळाडूंनी आपल्या कौशल्याचा उत्कृष्ट आविष्कार करत प्रेक्षकांची मने जिंकली.
सांस्कृतिक विभागात नृत्य, गायन, नाट्यप्रयोग, फॅन्सी ड्रेस, मेहंदी, सलाड डेकोरेशन, बेस्ट आउट ऑफ वेस्ट अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने आणि सर्जनशीलतेने रंगतदार सादरीकरणे करून उपस्थितांची दाद मिळवली. विशेषतः “बेस्ट आउट ऑफ वेस्ट” आणि मेहंदी स्पर्धांनी पर्यावरण संवर्धन आणि कलात्मकतेचा सुंदर संदेश दिला.
महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे व संस्थेचे खजिनदार डॉ. अमोल सुहास जोग व संस्थेच्या पदाधिकारी सौ. शुभदा अमोल जोग उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम हे केवळ करमणुकीपुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. अशा कार्यक्रमांमुळे आत्मविश्वास, नेतृत्वगुण, शिस्त व संघभावना वाढते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सूर्यवंशी, पी. जोग लॉ कॉलेज प्राचार्या सिद्धकला भावसार व ज्युनिअर कॉलेज प्राचार्या लीना शेंडे हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजनाची जबाबदारी ज्युनिअर कॉलेजचे उप प्राचार्य श्री. अमृत पाटील यांनी यशस्वी रीत्या पार पाडली.
कार्यक्रमाच्या शेवटी विविध स्पर्धांतील विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाची शोभा वाढवली.
“प्रवाह 2026” या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपले सुप्त गुण व्यक्त करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ मिळाले असून जोग एज्युकेशनल ट्रस्टच्या शैक्षणिक व सहशैक्षणिक कार्याची ही एक उज्ज्वल झलक ठरली आहे.



