पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रसामाजिक

संविधानाच्या प्रास्ताविकेसाठी काँग्रेसचे बेमुदत धरणे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू!

 

नगरसेविका तृप्ती कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची आंदोलकांची मागणी

सांगवी, दि. २३ ऑक्टोबर २०२६ | प्रतिनिधी

सांगवी येथील संविधान चौकातील भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचा शिलालेख हटवण्यात आल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेस आणि विविध पुरोगामी सामाजिक संघटनांच्या वतीने सुरू करण्यात आलेले बेमुदत धरणे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेचा शिलालेख पूर्ववत बसवावा, तसेच या प्रकरणात संबंधितांवर कायद्यानुसार गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. नगरसेविका तृप्ती कांबळे यांच्यावरही गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.

मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार :नरेंद्र बनसोडे 

पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष

नरेंद्र बनसोडे यांनी सांगितले की, संविधानप्रेमी नागरिक, काँग्रेसचे पदाधिकारी आणि विविध पुरोगामी सामाजिक संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या कामामुळे आंदोलन सुरू करण्यास विलंब झाला असला, तरी आता मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत आंदोलन सुरू ठेवण्यात येणार आहे.

संविधान चौकातील प्रास्ताविकेचा शिलालेख पूर्ववत बसवण्यात यावा आणि या प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील लागू तरतुदींनुसार संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी बनसोडे यांनी केली. संविधानाच्या प्रास्ताविकेला हात लावण्याचा प्रकार लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांशी संबंधित गंभीर विषय असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सुशोभीकरणाच्या नावाखाली शिलालेख हटवल्याचा आरोप   

संविधान चौकातील प्रास्ताविकेचा शिलालेख नगरसेविका तृप्ती कांबळे आणि त्यांचे पती संतोष कांबळे यांनी हटवल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. चौकाच्या सुशोभीकरणासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात असले, तरी संबंधित कामासाठी महानगरपालिकेची आवश्यक परवानगी, निधीची मंजुरी आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली होती का, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.

विविध सामाजिक संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बी. बी. शिंदे यांनीही आंदोलनाला पाठिंबा देत संबंधित नगरसेविका विरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. संविधानाच्या आधारे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या व्यक्तीकडूनच संविधान चौकातील शिलालेख हटवण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी या कृतीचा निषेध केला.

या प्रकरणात नगरसेविका तृप्ती कांबळे यांच्याऐवजी त्यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याबाबत त्यांनी आक्षेप नोंदवला. संबंधित व्यक्तींवर त्यांच्या भूमिकेनुसार कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. नगरसेविका तृप्ती कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयासमोर हजर करेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

आंदोलनात विविध पक्षांचे पदाधिकारी सहभागी

या आंदोलनावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, माजी नगरसेवक मारुती भापकर, भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रवीण कदम, छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, आम आदमी पक्षाचे शशी बावनकर, स्वराज इंडियाचे प्रदीप पवार, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष रवी नांगरे, बी. बी. शिंदे, अप्पा शिंदे, काँग्रेसचे हिराचंद जाधव, सदाशिव तळेकर, देवदत्त रानवडे, महिला नेत्या अनिता साळवे, अनिता सोनवणे, विलास सकट, विजय उदमले, विजय ओव्हाळ आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button