यशवंतभाऊ भोसले यांच्या ‘विनम्र अभियान पदयात्रे’ला मोठे यश!

महापौर रवी लांडगे यांचे कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस व वेतन देण्याचे आदेश; हजारो कामगारांच्या न्यायासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा लढा
पिंपरी (प्रतिनिधी) | गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर २०२६
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील कंत्राटी व मानधनावरील कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस आणि प्रलंबित वेतन मिळावे, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर ‘विनम्र अभियान पदयात्रा’ काढण्यात आली. या पदयात्रेला हजारो कामगारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पदयात्रेनंतर महापौर रवी लांडगे यांची भेट घेऊन कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. महापौरांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांना बोनस व वेतनासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
बाबासाहेबांना अभिवादन करून पदयात्रेला सुरुवात
भिमसृष्टी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी हजारो कामगार सहभागी झाले होते. कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी देण्यात आलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
३ नोव्हेंबरपूर्वी बोनस देण्याची मागणी
महापौर रवी लांडगे यांची महापौर कार्यालयात भेट घेऊन कामगारांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा बोनस आणि मासिक वेतन दिवाळीपूर्वी, म्हणजेच ३ नोव्हेंबर २०२६ च्या आत अदा करण्यात यावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली.
महापौरांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना बोनस अदा करण्याबाबत तातडीने परिपत्रक काढण्याच्या सूचना दिल्या.सर्व विभागांतील कंत्राटदारांनाही त्यांच्या कर्मचाऱ्यांना कायदेशीररीत्या देय असलेला बोनस देण्याबाबत निर्देश देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
साडेचार हजार कर्मचाऱ्यांसाठी समान वेतन व विम्याची मागणी
निवेदनामध्ये महानगरपालिकेच्या आरोग्य, वैद्यकीय, उद्यान, अग्निशमन, पाणीपुरवठा, जलवाहिनी, शिक्षण आणि स्मशानभूमी विभागांतील कंत्राटी व मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले.
महानगरपालिकेच्या विविध विभागांत कार्यरत असलेल्या सुमारे ४,५०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान कामासाठी समान वेतन द्यावे, कर्मचाऱ्यांचा कुटुंबासह पाच लाख रुपयांपर्यंतचा विमा उतरवावा, अपघाती अथवा आजारपणामुळे मृत्यू झाल्यास वारसांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी आणि पात्र वारसांना अनुकंपा तत्त्वावर महानगरपालिकेत नोकरी द्यावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
कामगारांच्या प्रश्नांवर स्वतंत्र बैठक घेणार : महापौर
यावेळी महापौर रवी लांडगे म्हणाले की, कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. महानगरपालिकेतील सर्व कंत्राटी व मानधनावरील कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी. बोनस देण्यासंदर्भातील परिपत्रक लवकरात लवकर काढण्यात येईल. तसेच समान काम समान वेतन, विमा संरक्षण, मानधनावरील नर्सेसचा प्रलंबित ठराव आणि कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सोमवारी किंवा मंगळवारी स्वतंत्र बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात येईल.
कामगारांच्या एकजुटीचा विजय : यशवंतभाऊ भोसले
कामगार नेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, दिवाळी बोनसच्या मागणीसाठी महापौरांची भेट घेतली असता त्यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने परिपत्रक काढण्याचे आदेश दिले. कायदेशीररीत्या पात्र असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला बोनस मिळालाच पाहिजे. काही ठेकेदार वेतनामध्येच बोनस समाविष्ट असल्याचे सांगून कामगारांची दिशाभूल करतात. अशा ठेकेदारांवरही योग्य कार्यवाही झाली पाहिजे.
समान काम समान वेतन, कर्मचाऱ्यांचा विमा, मानधनावरील नर्सेसचा प्रलंबित प्रश्न आणि कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरही लवकरच बैठक होणार असल्याचे आश्वासन महापौरांनी दिले आहे. महापौरांनी घेतलेल्या सकारात्मक निर्णयाबद्दल हजारो कामगारांच्या वतीने त्यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.



