पुणे मुंबई हायवे वरती वारजे ब्रिज जवळ टेम्पो ला अचानक आग मोठा अनर्थ टळला

वारजे प्रतिनिधी : सुनील पंदरकर
पुणे-मुंबई महामार्गावर आज सकाळी एका मिनीडोर मालवाहू गाडीला अचानक भीषण आग लागल्याची घटना वारजे ब्रीज परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती, मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दि. १८ एप्रिल रोजी सकाळी ९:१५ च्या सुमारास MH 12 TV 8182 या क्रमांकाची मिनीडोर मालवाहू गाडी महामार्गावरून जात असताना तिला अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले आणि गाडीचा पुढचा भाग पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
आग लागताच महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, वाहतूक पोलीस प्रशासनाने घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरित घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने इतर वाहनांना सुरक्षित बाजूला करून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करून दिला.
काही वेळातच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून गाडीला लागलेली आग आटोक्यात आणली आणि ती पूर्णपणे विझवण्यात यश मिळवले.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, भररस्त्यात अचानक लागलेल्या या आगीमुळे महामार्गावरील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. “वेळेवर मदत मिळाल्याने आणि पोलिसांनी रस्ता मोकळा केल्याने मोठा अनर्थ टळला,” अशा भावना प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत.
सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस या आगीच्या कारणांचा अधिक तपास करत आहेत.



