लातूरातील नामवंत RCC क्लासेसचे संचालक NEET पेपर लीक प्रकरणात सीबीआयच्या ताब्यात

खडकवासला प्रतिनिधी:: सुनील पंदरकर
लातूर शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या आरसीसी (रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस) चे संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांना NEET UG पेपर लीक प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (१७ मे) करण्यात आली असून सोमवारी (१८ मे २०२६) अधिकृत माहिती समोर आली.
सीबीआयकडून करण्यात आलेल्या झडतीदरम्यान मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG ची लीक झालेली प्रश्नपत्रिका आढळून आल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे. त्यानंतर त्यांना तातडीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
लातूर शहरातील शैक्षणिक क्षेत्रात RCC क्लासेस हे मोठे नाव मानले जाते. विशेषतः मेडिकल प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी राज्यभरातून विद्यार्थी येथे येत असल्याने या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
सीबीआयने या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, प्रश्नपत्रिका पुरवठा साखळी तसेच इतर संबंधित व्यक्तींच्या भूमिकेचाही तपास सुरू केला आहे. या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मोटेगावकर यांच्या अटकेनंतर विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, क्लासेसच्या पुढील कामकाजाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सीबीआयकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, संबंधितांकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे.



