कात्रज-नवले ब्रिज मार्गावर रिक्षाचालकावर कोयत्याने हल्ला; जुन्या वादातून मारहाण

पुणे, दि. १८ मे (प्रतिनिधी) : सुनील पंदरकर
कात्रज ते नवले ब्रिज महामार्गावरील राजमाता भुयारी मार्गाजवळ रविवारी सकाळी एका रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला करून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दत्तनगर चौक परिसरात सकाळी सुमारे १०:१५ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सुरज माणिक काळे (वय ३०, रा. जैन मंदिराजवळ, कात्रज, पुणे) असे जखमी रिक्षाचालकाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन ते तीन वर्षांपूर्वी प्रवासी भरण्याच्या कारणावरून झालेल्या जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी सकाळी सुरज काळे हे आपल्या कामानिमित्त दत्तनगर चौक परिसरात आले असता, काही हल्लेखोरांनी त्यांना अडवून कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार केले. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी व काठ्यांनी मारहाण करण्यात आली.
या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी सुरज काळे यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून जुन्या वैमनस्यातूनच हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, भरदिवसा महामार्गालगत घडलेल्या या हिंसक घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.



