पुण्यासह राज्यातील मेडिकल दुकाने बंद आंदोलनात सहभागी

आपला राजस्तंभ वृत्तसेवा
पुणे, दि. २० मे२०२६
खडकवासला म संघ प्रतिनिधी : सुनील पंदरकर
ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्सच्या (AIOCD) हाकेला प्रतिसाद देत पुणे शहरासह महाराष्ट्रातील अनेक मेडिकल दुकानदारांनी आज बंद आंदोलनात सहभाग घेतला. विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले असून शहरातील अनेक औषध दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली.
All India Organisation of Chemists and Druggists यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बंदमध्ये Maharashtra State Chemists and Druggists Association तसेच Chemist Association of Pune District यांचा सक्रिय सहभाग होता.
संघटनांनी मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये ऑनलाईन औषध विक्री तात्काळ बंद करणे, कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अव्यवसायिक सवलती रोखणे तसेच बनावट औषध विक्रीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय केंद्र शासनाच्या काही अधिसूचना मागे घेण्याची मागणीही करण्यात आली.
संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑनलाइन फार्मसी आणि मोठ्या कॉर्पोरेट साखळ्यांमुळे लहान मेडिकल व्यवसायिकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. यामुळे पारंपरिक औषध विक्रेते टिकून राहणे कठीण होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
बंदमुळे पुणे शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांना औषधे मिळण्यात अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, काही ठिकाणी आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, या आंदोलनाला राज्यभरातील मेडिकल व्यावसायिकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा संघटनांकडून करण्यात आला आहे. या बंदची घोषणा जगन्नाथ शिंदे, राजीव सिंघल, अनिल नावंदर तसेच पुणे डिस्ट्रीक्ट केमिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.



