पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रसामाजिक

पिंपरी चिंचवड चे महापौर मा.रविभाऊ लांडगे व उपमहापौर मा. शर्मीली ताई बाबर यांच्या हस्ते श्री अरुण तुकाराम बोऱ्हाडे यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित

सन्मानाबद्दल ऋणनिर्देश

पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
दिनांक २० ऑगस्ट २०२६ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात, सर्वसाधारण सभेत मी करीत असलेल्या साहित्य आणि कामगार चळवळ, तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन शहराच्या वतीने मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. महापौर मा. रविभाऊ लांडगे यांच्या हस्ते, तसेच उपमहापौर मा. शर्मिलाताई बाबर, स्थायी समिती अध्यक्ष मा. अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते मा. भाऊसाहेब भोईर, सत्तारूढ पक्षनेते मा. प्रशांत शितोळे, आयुक्त मा. विजय सूर्यवंशी आणि अन्य पदाधिकारी, महापालिकेचे सर्व नगरसेवक, अधिकारी, तसेच मोशीतील अनेक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा सन्मान स्विकारताना साहजिकच मनस्वी आनंद झाला.
याच शहरात जन्मलो, वाढलो आणि घडलोही. लहानपणापासून जपलेली साहित्याची आवड, काहीकाळ केलेली पत्रकारिता, कामगार चळवळीतील दीर्घकाळ दिलेले योगदान या सर्वांचे साक्षीदार म्हणून शहरवासीयांनी नेहमीच मला साथ दिली आहे.
हिंदुस्थान अँटिबायोटिक्स, बजाज ऑटो, फोर्स मोटर्स, सेंच्युरी एन्का इत्यादी कारखान्यातील कामगारांच्या प्रश्नांसाठी वेळोवेळी लढण्याचे बळ या शहराने दिले. तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून साहित्य व सांस्कृतिक चळवळीतही कार्यरत राहिलो. ज्या ज्या क्षेत्रात मी काम केले ते निष्ठापूर्वक आणि निरपेक्ष भावनेने केले आहे.
साहित्याची सेवा करताना काव्यसंग्रह, व्यक्तिचित्रण, वैचारिक व प्रबोधनपर लेखन अशा विविध विषयातील अठरा पुस्तके प्रकाशित होण्याची सृजनशीलता मला लाभली. मराठी भाषा संवर्धनासाठीही काम करता आले. वृत्तपत्रांतून स्तंभलेखन केले. इतिहास अभ्यास व गिरीभ्रमंती करताना महाराष्ट्रातील आणि देशातील शेकडो गडकिल्ले अभ्यासता आले. हे सर्व छंद व आवड जोपासताना या शहराने नेहमीच प्रोत्साहन दिले आहे.
माझ्या या सर्व धडपडीची दखल घेऊन आपल्या महानगरपालिकेने ज्या सभागृहाचा मी पाच वर्षे सदस्य म्हणून काम पाहिले, त्याच सभागृहात मानपत्र देऊन माझा केलेला सन्मान हा विलक्षण आनंददायी व प्रेरणादायी क्षण आहे. आतापावेतो राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर काही सन्मान व पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तरीही आपल्या शहराने, घरच्या मंडळींनी अधिकृतपणे केलेला हा सन्मान अतुलनीय आहे. या सन्मानामुळे अधिकाधिक कार्य करण्याची माझी उमेद वृद्धिंगत झाली आहे. यासाठी मी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि शहरवासीयांचा अंतःकरणपूर्वक ऋणी आहे. धन्यवाद.
तसेच या सन्मानानंतर समाजमाध्यमांतून मला शुभेच्छा देणाऱ्या, अभिनंदन करणाऱ्या सर्वांचा मी आभारी आहे.
(*अरुण तुकाराम बोऱ्हाडे*)
दिनांक : २१ ऑगस्ट २०२६

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button