वारजे-कर्वेनगर परिसरात गारांसह जोरदार अवकाळी पाऊस

वारजे माळवाडी प्रतिनिधी:सुनील पंदरक
२२ एप्रिल २०२६
मागील काही दिवसांपासून असह्य उष्णतेचा सामना करणाऱ्या वारजेकर आणि कर्वेनगरवासीयांना निसर्गाने मोठा दिलासा दिला आहे. काल संध्याकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास वारजे माळवाडी आणि कर्वेनगर परिसरात विजांच्या कडकडाटासह आणि गारांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला, तरी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. गेल्या आठवड्याभरापासून पुण्यात आणि विशेषतः वारजे परिसरात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला होता. कडक ऊन आणि रात्रीच्या वाढत्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले होते. घराबाहेर पडणे कठीण झाले असतानाच, काल सायंकाळी अचानक ढग दाटून आले आणि सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी पावसासोबत गाराही पडल्या. रखरखत्या उन्हात पडणाऱ्या या पावसाला अनेक नागरिक ‘उनसाळा’ म्हणत भिजण्याचा आनंद घेताना दिसले. बालगोपाळांनी गारा वेचण्यासाठी रस्त्यावर गर्दी केली होती, तर उष्णतेने हैराण झालेले नागरिक या नैसर्गिक गारव्याचे स्वागत करताना दिसले. संध्याकाळी कामावरून घरी परतण्याच्या वेळीच पाऊस आल्याने चाकरमान्यांची आणि पादचाऱ्यांची मोठी धावपळ झाली. रस्त्यांवर अचानक पाणी साचल्याने आणि विजांच्या कडकडाटामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दुचाकीस्वारांना आडोसा शोधण्यासाठी कसरत करावी लागली. या पावसानंतर परिसरातील तापमानात घट झाली असून वातावरणात आता सुखद थंडावा जाणवत आहे. मात्र, हा पाऊस अवकाळी असल्याने शेतीमाल किंवा फळबागांचे नुकसान होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. एकंदरीत, प्रचंड गर्मीनंतर आलेल्या या ‘सरप्राइज’ पावसाने वारजेकरांना मोठा मानसिक दिलासा दिला आहे.



